पैलवानकीचे प्रशिक्षण घेणाऱ्यासह तिघांना खडक पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात अटक

मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (07:49 IST)
नामांकित तालमीत पैलवानकीचे प्रशिक्षण घेणाऱ्यासह तिघांना पुण्यातील खडक पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात अटक केली आहे. या तिघांच्या टोळीकडून तबल 20 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. स्वारगेट परिसरातून त्यांना पकडण्यात आले आहे.
 
नितीन सुरेश भोसले (वय 29, रा. लक्ष्मीनगर, पर्वती पायथा पुणे), प्रतीक प्रकाश गव्हाणे (वय 20, रा. शिंदे वस्ती, मनपा शाळेजवळ, हडपसर, पुणे) आणि हृषीकेश बाळासाहेब गाडे (वय 21, रांका ज्वेलर्स शेजारी, रविवार पेठ, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
हृषीकेश गाडे हा पैलवान असून, तो शहरातील एका नामांकित प्रशिक्षण केंद्रात पैलवानकी शिकत आहे. तर इतर दोन आरोपी सराईत गुन्हेगार असून यांच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
 
शहरात दुचाकी चोऱ्या आणि घरफोड्या वाढल्या आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस गस्त घालत आहेत. यावेळी खडक पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत असताना आरोपी हे शंकर शेठ रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौक येथे थांबले असून त्यांनी 3 दिवसांपूर्वी दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशीत त्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर खडक पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करतात अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी मिळाली. पोलीस कोठडीत त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी पुणे शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून तब्बल 20 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या सर्व दुचाकी त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतात लपवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी या सर्व दुचाकी जप्त केल्या आहेत.
 
ही टोळी फक्त स्प्लेंडर दुचाकी चोरत असत. कारण या गाड्यांचे लॉक सहजपणे उघडले जात होते. लॉक केल्यानंतर देखील झटका देताच या गाड्याचे लॉक तुटते. त्यामुळे त्यांनी या गाड्या चोरल्या असल्याचे सांगितले आहे. या गाड्या फायनान्स कंपनीच्या असल्याचे ते सांगत. तसेच त्या अर्ध्या किंमतीत ग्रामीण भागात विकत असत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती