राज्यात अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्ष, कापूस, मिरची आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान

मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (13:58 IST)
राज्यभरात अवकाळी पावसाने अनेक भागांत अवकृपा केली आणि संकटामुळे शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला आहे. रविवारी रात्री,तसेच सोमवारी दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील पिके जमीनदोस्त झाली. तसेच हिवाळ्यात हिरव्या भाजीपाल्यासल टमाटा, हिरव्या मिरचीला मागणी असते, त्या पिकांमध्ये पाणी शिरून कुठे गारपीट होऊन पिकांचे नुकसान झाले आहे.

जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, अहमदनगर, वाशिम, नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात कांदा, द्राक्ष पिकांचे तर पुणे कांदासह बटाटा पिकांचं मोठे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्येही गारपिटीनं झोडपलं, द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे.

कांद्याचे मोठे नुकसान
उन्हाळी कांदा संपून आता लाल कांदा बाजारात यायला सुरुवात झालेली असतांना अवकाळी पाऊस व गारपिटीने पुन्हा एकदा चांगलेच झोडपल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या तीन महिन्यापासून दुष्काळी परिस्थिती असतांना कांद्याची लागवड करून वाढवण्यात आला होता. शेतातून कांदे काढायचे अन्‌‍‍ बाजारात विकायचे अशी परिस्थिती असतांना अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्याचा कांद्यावर घाला घातला. या गारपिटीमुळे शेतातील कांदा सडून शेतकऱ्याच्या हाती काहीच शिल्लक राहणार नाही.त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात अधिक कांदा पिक घेतले जाते.

नंदुरबार : अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका नंदुरबारमधील मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्याकडून खरेदी केलेली जवळपास 20 ते 25 हजार क्विंटल मिरची पाण्यात भिजल्याने खराब होण्याची शक्यता आहे.

जळगावच्या 1100 शेतकऱ्यांनाअवकाळीची बसली झळ
जळगाव जिल्ह्यातील 552 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान कांद्याचे झाले आहे. वीज पडल्याने एक महिला जखमी झाली आहे. दोन गायींसह एक म्हैसदेखिल वीज पडल्याने ठार झाली आहे. एका दिवसाच्या अवकाळी पावसाने 1126 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. रविवारी वादळ आणि गारपिटीसह जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाचोरा, चाळीसगाव आणि जामनेर या तीन तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.भडगाव तालुक्यातील आडळसे येथील प्रतीक्षा गणेश साळुंखे ही महिला वीज पडल्याने जखमी झाली आहे. तर, सत्रासेन (चोपडा) येथील सुभाष संजय पाटील आणि मुक्ताईनगरच्या घोडसगावमध्ये एका घराचे अंशत: नुकसान झाले आहे. वीज पडल्याने सामरोद (जामनेर) येथील सुनील धनराज पाटील यांच्या मालकीची एक म्हैस जागीच ठार झाली. तर चाळीसगावच्या शिरसगावात निंबा भिकन चव्हाण यांच्या मालकीच्या दोन गायींचा मृत्यू झाला आहे.

दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
उत्तर महाराष्ट्रात रविवारी दुपारनंतर सुरु झालेल्या पावसाने शेतकरी हादरले असून नाशिक जिल्ह्यातील चांदवड, निफाड, येवला, सिन्नर या चार तालुक्यांत तसेच धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात गारपीट झाली. गारांचा मारा लागून नाशिक जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळपासून ढगाळ हवामान होते. दुपारनंतर काळोख दाटून येऊन रिमझिम पावसाला सुरुवात झाली. चार वाजेनंतर पावसाचा वेग वाढला. नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळस येथील सुभाष मत्सागर (65) या शेतकऱ्याचा पावसामुळे तर, बागलाण तालुक्यातील भाटंबा येथे वीज कोसळून सुरेश ठाकरे (35) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती