सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गुजरातमध्ये अवकाळी पावसात वीज कोसळून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गुजरातमधील विविध भागात वीज पडण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे.
गुजरातमधील दाहोदमध्ये सर्वाधिक चार जणांचा मृत्यू झाला. भरुचमध्ये तीन, तापीमध्ये दोन आणि अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाड, खेडा, मेहसाणा, पंचमहाल, साबरकांठा, सुरत, सुरेंद्रनगर, देवभूमी द्वारका येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तापी जिल्ह्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. शनिवार पासून गुजरात मध्ये अवकाळी पाऊस कोसळत आहे. अहमदाबाद, आनंद, देवभूमी, खेडा, द्वारका, पाटण, सांबारकाठा, पंचमहल,बोटाद, सुरेंद्रनगर, सुरत जिल्ह्यात मुसळधार पावसाने झडी लागली आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पिकांच्या नुकसानीव्यतिरिक्त, सौराष्ट्रातील मोरबी जिल्ह्यातील सिरेमिक उद्योगाचेही मोठे नुकसान झाले आहे कारण मुसळधार पावसामुळे येथील कारखाने बंद पडले आहेत.
हवामान खात्याने म्हटले आहे की सोमवारी पाऊस कमी होईल आणि तो गुजरात आणि सौराष्ट्रच्या दक्षिण भागात मर्यादित असेल. या अवकाळी पावसाचे कारण ईशान्य अरबी समुद्रातील चक्रीवादळ आहे, ज्याचा परिणाम सौराष्ट्र आणि कच्छच्या भागात होत आहे.