राज्यातील नगरपालिका – नगरपंचायती तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागा मिळविल्या असून पुन्हा एकदा भाजपाच नंबर वन हे सिद्ध झाले आहे, असे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी सांगितले.
मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भाजपाला या निवडणुकीत चारशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. स्वबळावर किंवा काही मदत घेऊन ३४ नगरपालिका – नगरपंचायतींमध्ये भाजपाची सत्ता असेल. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता असेल तर भंडारा जिल्हा परिषदेत मदत घेऊन भाजपा सत्तेवर येईल.
ते म्हणाले की, सत्ताधारी आघाडीमध्ये बेबनाव आहे. त्यांच्यात समन्वय नाही. कोरोनाचा सामना करणे आणि राज्यात विकासकामे करण्यापेक्षा आघाडीचे नेते कमाईमध्ये गुंतले आहेत. जनता या प्रकाराला कंटाळली आहे. जनतेची नाराजी नगरपालिका – नगर पंचायतींच्या निकालात दिसली.
राज्यात नोव्हेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. त्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका, जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका किंवा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनतेने भाजपाला कौल दिला होता. तसाच कौल नगरपालिका – नगरपंचायतींच्या निवडणुकीतही दिला आहे, असे त्यांनी सांगितले.