वेळप्रसंगी नगर शहराचा महापौर काँग्रेसचा असेल – महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात

शनिवार, 27 मार्च 2021 (16:54 IST)
अहमदनगर  काँग्रेस हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. धर्मनिरपेक्षता हा काँग्रेसचा शास्वत विचार आहे. नगर शहरामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे.किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये पक्षाची सुरू असणारी संघटनात्मक घोडदौड अशीच कायम राहिली तर वेळप्रसंगी नगर शहराचा महापौर देखील काँग्रेसचा होईल, असा आशावाद राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
शहर जिल्हा काँग्रेची संघटनात्मक आढावा बैठक ना. थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे होते.यावेळी बोलताना ना.थोरात म्हणाले की संघटनात्मक फेरबदल करत असताना नगर शहरामध्ये किरण काळे यांच्या रूपाने नवीन दमाचा चेहरा पक्षाने दिला आहे. शहरामध्ये काँग्रेस जोमाने काम करत आहे.
मी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. शहरातल्या विविध घटकांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व ताकद काळे यांच्या पाठीशी उभी केली जाईल.
ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी असिर सर यांच्या नंतर नगर शहरामध्ये विधानसभेमध्ये काँग्रेसच्या वतीने जाण्याची क्षमता असणारा चेहरा म्हणून किरण काळे यांच्याकडे नगर शहर पाहत आहे असे नमूद केले.
त्याचा धागा पकडत ना.बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठरवलं तर ही गोष्ट अशक्य नाही. त्यामुळे काळे यांचे भवितव्य उज्वल आहे.
यावेळी बोलताना किरण काळे यांनी ना. बाळासाहेब थोरात यांच्या समोरच महानगरपालिकेतील भाजप-राष्ट्रवादी अभद्र युतीवर सडकून टीका केली. राज्यात महाविकास आघाडी एकत्र असताना शहरात मात्र चुकीच्या पद्धतीने मित्रपक्ष वागत आहे. काँग्रेस शहरामध्ये त्यामुळे विरोधी बाकावर असून नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी आक्रमक भूमिका घेत असल्याचे यावेळी काळे यांनी सांगितले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती