देशातून मान्सून पूर्णत: परतला असून अनेक राज्यांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसून येत आहेत. दुसरीकडे खरीप हंगामातील पिके काढणीला आली असल्याने शेतीकामाला वेग आला आहे. अशातच हवामान खात्याने देशासह राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कोकण किनारपट्टी भागात सकाळी थंडी आणि दुपारी उन्हाचा तडाखा जाणवत आहे.
ऐन रब्बी हंगामामध्ये राज्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्येही अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. केरळमधील मलप्पुरम, इडुक्की आणि पठानमथिट्टा जिल्ह्यांमध्ये आज म्हणजेच 6 नोव्हेंबर रोजी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.