राज्यभरातील तापमानात वाढ नाही

बुधवार, 11 मार्च 2020 (09:48 IST)
पुढील आठवडय़ापर्यंत राज्यभरातील तापमानात वाढ होणार नसल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुढील दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
 
फेब्रुवारीच्या अखेरीस राज्यातील तापमानात विचित्र बदल झाले होते. किनारपट्टीसह मुंबईच्या तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यानंतर मुंबईचे तापमान पुन्हा खाली उतरले. तर गेल्या आठ दिवसात मुंबईचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २० अंशाच्या दरम्यान होते. त्यामध्ये पुढील चार दिवसात फारसा बदल होणार नसल्याचे हवामान विभागाने सांगितले. गेल्या दहा वर्षांत मार्च महिन्यात मुंबईचे सर्वाधिक कमाल तापमान ४० अंशापर्यंत नोंदविण्यात आले होते, तुलनेने यावर्षी पहिल्या पंधरवडय़ात तापमानात फार मोठी वाढ झालेली दिसत नाही.
 
सध्या उत्तर-पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या प्रभावामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने सांगितले. दरम्यान मंगळवारी मध्य महाराष्ट्राच्या काही भागात सरासरीच्या तुलनेत किचिंत वाढ झाली. राज्याच्या उर्वरीत भागात तापमान सरासरीच्या जवळपास होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती