कस्तुरबा मोहनदास गांधी यांच्या जन्म 11 एप्रिल 1869 मध्ये पोरबंदरच्या काठियावाड येथे एक श्रीमंत व्यापारी गोकुळदास कपाडिया यांच्या घरी झाला. कस्तुरबा गांधी या महात्मा गांधींच्या धर्मपत्नी होत्या. लग्नाच्या वेळी दोघांचेही अवघे वय 13 वर्षे होते. कस्तुरबा गांधी या लग्नाच्या वेळी निरक्षर होत्या. कस्तुरबा गांधींचे टोपण नाव 'बा' हे होते. त्या निरक्षर असल्यामुळे महात्मा गांधींनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. त्या नंतर मात्र गांधीजी हे विद्याभ्यासासाठी लंडनला गेले. तेव्हा कस्तुरबा या भारतातच राहिल्या. त्यांना हरिलाल, मणिलाल, रामदास, देवदास अशी मुले होती.
1906 मध्ये ब्रम्हचर्य पालनाचा निर्णय महात्मा गांधींनी घेतला. तसेच कस्तुरबांनी या निर्णयास खंबीर साथ दिली. तसे पहायला गेले तर गांधीजींचे अनेक निर्णय त्यांना पटत नसत. तरी पण त्या प्रत्येक निर्णयात महात्मा गांधीजीं सोबत राहिल्या, कस्तुरबा या खूप गोड बोलायच्या. तसेच त्या धार्मिक देखील होत्या व आपल्या पतीप्रमाणे त्यांनी जातिभेदाचा त्याग केला व सर्व जातीधर्माच्या लोकांबरोबर आश्रमात राहिल्या.
पतीच्या राजकीय कार्यात कस्तुरबा गांधींनी सक्रिय सहभाग घेतला होता. 1897 साली त्या महात्माजींबरोबर राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेस गेल्या. तसेच तिथे कस्तुरबा गांधींनी गांधीजींसोबत जवळून काम केले. त्यावेळेस महात्मा गांधी हे वर्णद्वेषाच्या विरोधात लढत होते, तेव्हा कस्तुरबा या गांधीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. तसेच कस्तुरबा गांधींना तीन महिने आफ्रिकेत तुरुंगात राहावे लागले त्यावेळी त्यांनी अन्न सेवन न करता फक्त फळे सेवन केली.
कस्तुरबा गांधींचे स्वातंत्र्यातील योगदान खूप मोठे आहे. महात्मा गांधींनी त्यांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत केली. म्हणूनच त्या निष्ठावंत होत्या. त्यांनी गांधीजींना खूप साथ दिली. गांधीजी आणि कस्तुरबा भारतात परतले तेव्हा कस्तूरबांनी अत्यंत साधे जीवन स्वीकारले. तसेच त्या आंदोलने आणि सत्याग्रहांमध्ये गांधीजींसोबत सहभागी होऊ लागल्या. जेव्हा पण गांधीजींना तुरुंगात टाकले जायचे तेव्हा कस्तुरबा त्यांची जागा घ्यायच्या. तसेच त्यांनी अनेक गावांना भेट दिलीत व महिलांना प्रोत्साहीत केले. कस्तुरबा गांधी एक महिला स्वातंत्र्य सेनानी आणि राजकीय कार्यकर्त्या होत्या.
बिहारमध्ये 1917 मध्ये चंपारण चळवळ सुरू झाली त्यावेळेस कस्तुरबांनी सक्रिय भूमिका बजावली. तसेच त्यांनी महिलांच्या कल्याणासाठी काम केलेत. गरीब मुलांना शिकवले. कस्तुरबा लोकांना नेहमी जागृत करायच्या. कस्तूरबांना 1932 मध्ये सतत क्रांतिकारी कार्यात भाग घेतल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागला.
लहानपणापासूनच कस्तुरबा गांधी यांना क्रॉनिक ब्राँकायटिसचा त्रास होता. तसेच पुढे त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचे दोन झटके आले. 22 फेब्रुवारी 1944 मध्ये पुणे येथील आगा खान पॅलेसमध्ये त्याचे निधन कस्तुरबा गांधी या अनंतात विलीन झाल्यात. कस्तुरबा गांधींचे भारताच्या स्वतंत्र्यासाठीचे योगदान खूप मोठे आहे.