१ जुलैपासून ‘आधार’ नाही तर रेशनही नाही

सोमवार, 22 मे 2017 (10:50 IST)
‘ज्या कुटुंबातील एकही लाभार्थी व्यक्तीचे आधार कार्ड रेशनकार्डशी लिंक नसेल, अशा कार्डावर यापुढे रेशनचे धान्य दिले जाणार नाही. १ जुलैपासून हा निर्णय अंमलात येणार आहे’, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी दिली. राज्यात ईपीडीएस या प्रणाली अंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणीकीकरण झाल्याचे नरके यांनी सांगितले.
 
अन्न पुरवठा विभागाने याची प्रभावी अंमलबजावणीचे आदेश आज राज्यातील पुरवठा अधिकार्‍यांना दिले. पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी राज्याच्या ईपीडीएस प्रणालीचा आढावा घेतला असता यावेळी हे आदेश देण्यात आले.
 
जिल्हा पुरवठा अधिकारी नरके म्हणाल्या, ‘ईपीडीएस प्रणालीत नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. यात सर्व रेशन कार्डधारकांचा तपशील नोंदवला आहे. सुमारे ९२ टक्के आधार लिंक झाले आहे. आता यासंदर्भात अधिसूचना आली आहे. एखाद्या कुटुंबातील एकाही व्यक्तीचे आधार लिंकिंग झाले नसेल, तर संबंधित रेशनकार्ड हे बोगस ठरविले जाणार आहे. त्यावरील सर्व लाभ बंद होणार आहेत.’
 
सध्या आधार कार्डातील ओळख पटविण्यात ज्या ठिकाणी तांत्रिक अडचणी येत आहेत. अशा कार्डावर धान्य दिले जात असले तरी तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी सॉप्टवेअरमध्ये हा सर्व डाटा भरण्यात येत असून आधार लिंकचा डाटा आणि पुरवठा विभागाकउे प्राप्त डाटा पडताळणी करण्यात येणार असल्याचेही नरके यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा