जमिनीच्या वादातून पुतणीची हत्या

मंगळवार, 21 फेब्रुवारी 2023 (16:50 IST)
शेतजमीनीवरुन सख्ख्या भावाशी झालेल्या वादात चार वर्षीय पुतणीला नदीत फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडली आहे. ज्ञानदा यशोधन धावणे असे मृत चिमुकलीचं नाव आहे तर आरोपी काका यशोदीप धाकणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मोहोळ तालुक्यातील डिकसळ येथील रहिवासी यशोधन शिवाजी धावणे यांची वडिलोपार्जित 16 एकर शेतजमीन यापैकी पाच एकर त्यांच्या नावे, पाच एकर भाऊ यशोदीपच्या नावे तर उर्वरित सहा एकर जमीन आईच्या नावे आहे. आईच्या नावावर असलेली सहा एकर शेतजमीन ही आपल्या नावावर करावी यावरुन आरोपी सातत्याने भांडण करत होता.
 
याच कारणावरुन 20 फेब्रुवारी रोजी दोन्ही भावांमध्ये पुन्हा भांडण झाले. त्यानंतर चिमुकल्या ज्ञानदाचे वडील यशोधन हे आई आणि पत्नीसह शेतात गेले. काही कामानिमित्त घरी परतल्यानंतर घरात मुलगी आणि वडील दोघे घरात न दिसल्यामुळे चौकशी केल्यास वडील मंदिरात दर्शनासाठी गेले होते तर ज्ञानदा घरात झोपलेली असल्याचे सांगितले. मात्र मुलगी घरात नसल्याने त्यांनी आसपास चौकशी केली तेव्हा भाऊ यशोदीप ज्ञानदाला गाडीवर घेऊन गेल्याचे लोकांनी सांगितले. भावाला फोन लावल्यानंतर त्याने पुतणीला मलिकपेठ येथील सीना नदीच्या पात्रात फेकून दिल्याचे सांगितले.
 
यशोधन यांनी तात्काळ मालिकपेठला धाव घेतली तर नदी पात्रात ज्ञानदा पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आहे. चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयात आणले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती