शेजारीच बनला वैरी! कापडणीस बापलेकाच्या हत्येचा झाला उलगडा

बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (21:17 IST)
येथील गंगापूर रोडवर ठराविक दिवसांच्या अंतराने बाप आणि लेकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नानासाहेब रावजी कापडणीस व अमित नानासाहेब कापडणीस अशी खून झालेल्या बापलेकाची नावे आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्याच्या मध्यावधीत संशयित राहुल गौतम जगताप (वय ३६, रा. एमआयएस कॉलनी, एअर फोर्स स्टेशन लहवित, नाशिक) याने पैशांच्या हव्यासापोटी व त्यांची मालमत्ता हडपण्याच्या उद्देशाने एक कट रचला. गंगापूर रोडवरील तारांगण पान दुकानाच्या समोर नानासाहेब रावजी कापडणीस यांचा खून केला. त्यानंतर पुढील आठवड्यात मुलगा अमित नानासाहेब कापडणीस याचाही खून केला. यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी दरी मातोरी रस्त्याने पुढे जाऊन दुगाव फाटा तसेच आंबोली घाटाच्या पुढे जात जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्यावर मृतदेह जाळून टाकले. त्यानंतर मृतदेह दरीत फेकून दिले. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळून टाकण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल हा कापडणीस यांच्या घराशेजारीच राहत होता. त्याने कापडणीस यांचे शेअर्सचे कागदपत्र मिळवून ते विक्री केले आणि ती रक्कम हडपली. कापडणीस यांच्या बँक खात्यावरुन राहुलच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी राहुलला अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त दिपाली खन्ना, वपोनि साजन सोनवणे, सपोनि यतीन पाटील, पीएसआय मच्छिंद्र कोल्हे आणि संपूर्ण टीमने केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती