पक्ष कार्यकारणीच्या 3 तारखेच्या बैठकीत रणनिती आखणार

शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017 (14:26 IST)
पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे  आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सोलापूरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, ३ तारखेला मुंबईत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यकारणी बैठकीविषयी माहिती दिली. या बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा होणार असल्याची आणि योग्य रणनिती आखली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेसाठी जिल्हाध्यक्ष दिपक आबा साळुंखे आणि पक्षाच्या राज्य महिला अध्यक्षा चित्रा वाघ  उपस्थित होते.
 
यावेळी अजित पवार यांनी साडेतीन वर्ष पूर्ण होऊनही भाजप सरकारने दाखवलेल्या स्वप्नांची पूर्तता केली नसल्याचे स्पष्ट केले. सत्तेतील लोक मग्रुरीची भाषा वापरत आहेत. महागाईत सामान्य माणूस भरडून गेला आहे. गरीब माणसाची साखर सरकारने हिसकावून घेतली. सरकार योग्य प्रकारे धोरणं राबवत नाही. चावडीवर शेतकऱ्यांचे नाव वाचून हे सरकार त्यांचा अपमान करणार आहे. सरकार एकीकडे क्रीडा शिक्षकांची भर्ती बंद करत आहे तर दुसरीकडे फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याची टीका त्यांनी केली. अंगणवाडी सेविकांना खूप कमी वेतन आहे. ३ हजार रुपये महिन्यात काय होतं? सरकार जरी कोर्टात गेले तर कोर्ट नक्कीच याबाबत योग्य निर्णय घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
मुंबई-सोलापूर विमान सेवा का बंद झाली? ज्या ज्या भागात विमान सेवा सुरू होणार होती ती का झाली नाही? सरकारची भूमिका दुटप्पी आहे. सर्व विकासाच्या गोष्टी गुजरातकडे घेऊन जात आहे. सरकारने महाराष्ट्राच्या जनतेचे हित जोपासले पाहिजे पण तसे होताना दिसत नाही ही खंत असल्याचे ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती