बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाने महाविकास आघाडीला मोठे खिंडार पाडले आहे. कारण, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या ५० पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. तसेच, परभणीमध्ये महाविकास आघाडीचे तब्बल ३० नगरसेवक शिंदे गटामध्ये जाणार आहेत. अशामध्ये आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची ताकद आणखी वाढणार आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना ठाकरे गटाला हा मोठा धक्का दिला आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "विरोधकांना आरोप करत राहूद्या, मी काम करत राहीन. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानुसार चालत असताना अनेक लोकं पक्षाशी जोडली जात आहेत. त्यामुळे या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. राज्यात आपले सरकार आल्यापासून काम करणारे, शेतकरी, कामगार अशा सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे." यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार शिवाजीराव जाधव, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ठाकरे गटाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के तसेच परभणी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor