बिहार येथून सांगली आणि पिंपरी चिंचवड येथे मदरशात दाखल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या २९ लहान मुलांना मनमाड आणि ३० मुलांना भुसावळ येथे रेल्वे पोलीस आणि आरपीएफ यांनी ताब्यात घेऊन त्यांची बालसुधार गृहात रवानगी केली आहे. एका प्रवाशाला संशय आल्यानंतर त्याने ट्वीट करून रेल्वे प्रशासनाला माहिती दिल्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलीस सूत्रांनी दिली असून याप्रकरणी मुलांसोबत असलेल्या चार शिक्षकांविरुद्ध कलम ४७० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधून महाराष्ट्रात रेल्वेने प्रवास करत दाखल झालेल्या २९ अल्पवयीन मुलांना मनमाडमध्ये तर ३० लहान मुलांना भुसावळ रेल्वे स्थानकावर सोडवण्यात आले. दानापूर-पुणे एक्सप्रेस रेल्वे गाडी नंबर 01040 यामध्ये लहान बालके असल्याची गोपनीय माहिती भुसावळ रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस भुसावळ यांना मिळाली होती.
त्यानुसार रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करत भुसावळ येथील एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने दाणापूर पुणे ही एक्सप्रेस भुसावळ स्टेशनवर आल्यानंतर त्याची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या डब्यांमधून ८ ते १५ वयोगटातील ३० मुलांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने ताब्यात घेतले. या सर्व मुलांना रेल्वे स्थानकावर उतरवून त्यांच्यासोबत असणाऱ्या एका संशयिताला शिताफीने पकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
त्यानंतर भुसावळ ते मनमाड दरम्यान एक्सप्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांकडून पुन्हा मनमाडपर्यंत प्रवासात रेल्वे गाडीत शोध मोहिम राबविण्यात आली. यावेळी रेल्वे गाडीत आणखी २९ मुले आणि ४ संशयित मिळून आले. यानंतर सर्वांना ताब्यात घेत मनमाड रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. तसेच भुसावळ येथे मिळून आलेल्या ३० मुलांना जळगाव येथील बालसुधार गृहामध्ये काळजी घेण्यासाठी पाठवण्यात आले असून मनमाड येथील २९ मुलांना नाशिकच्या बालसुधार गृहामध्ये रवाना करण्यात आले आहे.