नाशिकमध्ये सर्वाधिक निच्चांकी तापमानाची नोंद शहर ६.६ तर निफाड ५.५ अंश सेल्सिअस

सोमवार, 24 जानेवारी 2022 (21:00 IST)
नाशिक शहरात सोमवारी सर्वाधिक निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. सोमवारी शहरात ६.६ तर निफाडमध्ये ५.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
 
आठवडाभरापासून तापमानात घट होऊन गारवा निर्माण झाल्याने शहरवासीयांना पुन्हा हुडहुडी भरली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमानातं वाढ झाली होती. त्यामुळे थंडी काही अंशी कमी होती. मात्र मागील दोन तीन दिवसांत तापमानात प्रचंड घसरण झाली आहे. तर नाशिकचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाड ला देखील कडाक्याची थंडी पडली आहे. सोमवारी निफाड गहू संशोधन केंद्रात हंगामातील सर्वात कमी ५. ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या मोसमातील सर्वात कमी ५.५ तापमानाची नोंद झाली. हवेत प्रचंड गारवा निर्माण झाल्याने थंडीत वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
 
दरम्यान नाशिक जिल्ह्यात कडाक्याची थंडीने नागरिक गारठले असून सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत शेकोट्या पेटलेल्या दिसून येत आहे. या थंडीमुळे शेतीवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. द्राक्ष, गहू आदी पिकांवर थंडीचा परिणाम जाणवू लागला आहे. रात्री पहाटे पेटणाऱ्या शेकोट्या दुपारच्या सुमारासही पेटताना दिसून येत आहे. वाफाळलेला चहा आणि गरमागरजम दूध प्यायला नागरिक हॉटेलमध्ये गर्दी करत आहेत. मात्र, अचानक बदलेल्या या वातावरणामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा धास्तावलेला दिसत आहे.
 
नाशिक जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला असून कमालीची थंडी अनुभवयास मिळत आहे. तर दुसरीकडे दिवसभर धुळीचा परिणाम वातावरणात दिसत आहे.  दरम्यान पाकिस्तानात उठलेल्या धुळीच्या वादळाने आता थेट नाशिककरांच्या  उंबऱ्यावर धडक दिल्याने चिंता वाढली आहे. मध्यरात्री ते भल्या पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळत असून काही ठिकाणी धुकेही दिसत आहे. त्यात वाढलेल्या गारठ्याने नागरिक गारठले असून शेतकरी पुन्हा एकदा वातावरण बदलामुळे धास्तावला आहे. या विचित्र हवामानामुळे द्राक्ष, आंबा आणि कांदा पिकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होते आहे.
 
पाकिस्तानमध्ये उठलेल्या धुळीच्या वादळामुळे मुंबई, नाशिकला फटका बसत आहे. त्यात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नाशिकमध्ये पहाटेच हलक्या पावसाने हजेरी लावली. हवेत बाष्प आणि धुलिकण असल्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती