सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधाकृष्णनगरमधील सरोदे संकुलमध्ये ललेंद्र सिंह यांचे कुटुंब राहते. बुधवारी (२० एप्रिल) रात्री १० वाजेच्या सुमारास अर्चना सिंह (वय ४०) या स्वयंपाक करीत होत्या. त्याचवेळी गॅस लिक होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र, त्यांनी काही करण्याच्या आताच आगीचा भडका झाला आणि सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत अर्चना आणि त्यांची मुलगी आस्था (वय १६) हे दोन्ही जखमी झाले. दोघांनाही तातडीने उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अर्चना या ७५ टक्के तर आस्था ही २० टक्के भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, अर्चना यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर, हस्ता हिच्यावर उपचार सुरू आहेत.
स्फोट झाला त्यावेळी ललेंद्र सिंह यांनी अर्चना आणि आस्था या दोघांनाही घराबाहेर सुरक्षित काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक झालेल्या स्फोटामुळे अर्चना या प्रचंड घाबरल्या होत्या. त्यामुळेच त्या आगीतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवित नव्हत्या. अखेर मोठ्या महत्प्रयासाने त्यांना घराबाहेर काढण्यात आले. मात्र, त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण, त्यांचा मृत्यू झाला. तर, आगीचा भडका झाल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने महापालिका अग्निशमन विभागाला कळविले. विभागाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले.दरम्यान, या स्फोटामुळे परिसरातील घरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते.