गुरूवारपासून नागपूर हिवाळी अधिवेशन

बुधवार, 6 डिसेंबर 2023 (08:21 IST)
नागपूर  : राज्य विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाला उद्या सुरुवात होत असून विविध विषयांवर सरकारला घेरण्यासाठी आक्रमक असलेले विरोधक व विधानसभा निवडणुकीतील विजयाने आत्मविश्वास वाढलेल्या सत्ताधा-यांमुळे हे अधिवेशन गाजणार अशी चिन्हे आहेत. मराठा, धनगर आरक्षणाच्या मुद्यांबरोबरच अवकाळी पावसासाठी भरीव नुकसानभरपाई, शेतकरी कर्जमाफी, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, नाशिकचे ड्रग्ज प्रकरण आदी विषयांवर सरकारला घेरण्याची जय्यत तयारी विरोधकांनी केली आहे.
 
सत्ताधा-यांनीही मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळ्यासह ठाकरे सरकारमधील प्रकरणाचा दारूगोळा सज्ज ठेवला असल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडण्याची शक्यताही आहे. जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी दिलेली मुदत २४ डिसेंबरला संपणार असल्याने मराठा आरक्षणाचा ठरावही या अधिवेशनात केला जाण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या या कार्यकाळातील हे शेवटचे नागपूर अधिवेशन असल्याने महायुती सरकार विदर्भाला काय देणार? या कडेही सर्वांचे लक्ष आहे.
 
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर (गुरुवार)पासून नागपूर येथे सुरू होत आहे. राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण बघता उद्याच्या चहापानापासूनच राजकारण तापणार अशी चिन्हं आहेत. सध्या नागपूरमध्ये पावसाळी वातावरण आहे. मिचाँग चक्रीवादळाचे परिणाम नागपुरातही दिसण्याची शक्यता आहे. पुढील दोन-तीन दिवसांत राज्याच्या काही भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शेतीवर पुन्हा अवकाळीचे संकट ओढवणार की काय, अशी भीती आहे.
 
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दुष्काळ व अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतक-यांसाठी भरीव मदतीचे पॅकेज जाहीर करावे, शेतक-यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, ही मागणी लावून धरण्याची रणनिती विरोधकांनी आखली आहे. शेतक-यांवर संकट आले तेव्हा अन्य राज्यांच्या निवडणूक प्रचारात रंगलेले सत्ताधारी, नुकसानीच्या पांचानाम्याला होणारा विलंब, या वरून सरकारवर घेरण्याचे संकेत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती