विदर्भातील गुंतवणूक वाढीसाठी नागपुरात ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ घेणार

सोमवार, 18 एप्रिल 2022 (08:43 IST)
विदर्भात मिहानच्या माध्यमातून व अन्य एमआयडीसीमध्ये अधिकाधिक प्रकल्प उभे रहावेत यासाठी विदर्भाच्या औद्योगिक विकासावर लक्ष्य असून नव्याने गुंतवणुकीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून नवीन उद्योगांना आकर्षित करणारा मॅग्नेटिक महाराष्ट्र हा गुंतवणुकीचा महोत्सव नागपुरात घेण्याचा शासन विचार करत  असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल शनिवारी येथे दिली.
 
विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनचा 58 वा स्थापन दिवस आणि चौथ्या व्हीआयए सोलर विदर्भ उद्योग गौरव पुरस्काराचे वितरण हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये  काल रात्री उशीरा झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी  ही घोषणा केली. यावेळी व्यासपिठावर व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी, ज्युरी सदस्य माजी न्यायमुर्ती आर. के. देशपांडे, सोलर इंडस्ट्रिज इंडिया लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष नुवाल, डालमिया सिमेंट (इं.) लि.चे कार्यकारी संचालक हकीमुद्दीन अली, आर. सी. प्लास्टोचे टॅक्स ॲण्ड पाईप्सचे संचालक विशाल अग्रवाल उपस्थित होते. या कार्यक्रमाला खासदार कृपाल तुमाने, आमदार ॲड आशिष जायस्वाल उपस्थित होते.  यावेळी  नऊ वर्गवारीत विदर्भातील उद्योजकांना पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्काराचे वितरण सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
 
यावेळी सुभाष देसाई म्हणाले, विदर्भात गुंतवणूकदार येण्यास तयार आहेत. नागपूर व अमरावती याठिकाणी विशेष प्रयत्न सुरू आहे. यवतमाळ सारख्या ठिकाणी ऑस्ट्रेलीयाची एक कंपनी गुंतवणूक करण्यास पुढे आली आहे. त्यासाठी प्रयत्न शासनस्तरावर तसेच संघटनात्मक स्तरावर प्रयत्न सुरू असावेत.  विदर्भातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी व्हीआयएने सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. लघु उद्योगांनी पाठपुरावा करून आपल्या संकल्पना प्रत्यक्षात आणाव्यात. राज्य सरकार  अशा उद्योजकांना मदत करण्यास सदैव तयार आहे. स्पर्धेच्या युगात महिला उद्योजकांनी ठसा उमटविणे हे आव्हानात्मक काम आहे. शासनाने महिला उद्योजकांसाठी अनेक योजना आणल्या असून त्याचा फायदा घ्यावा. युवकांनीही उद्योग स्थापनेसाठी पुढे यावे, असे आवाहन देसाई यांनी केले.
 
कार्यक्रमात बीएमएचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, एमआयएचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगावकर, कोसिया विदर्भाचे अध्यक्ष सीए जुल्फेश शाह, टाटा स्टीलचे मधुकर ठाकूर, व्हीआयएचे माजी अध्यक्ष अतुल पांडे, कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य, व्हीआयए महिला विंगच्या पदाधिकारी, विदर्भातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अनेक संस्थांचे यावेळी उद्योगमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती