येथील पाडवा पटांगण, (जुने भाजी मार्केट), नारोशंकर मंदिराजवळ, पंचवटी येथे २५ हजार स्क्वेअर फुटांची (२५० फूट बाय १०० फूट) ही भव्य रांगोळी साकारण्यात आली असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महान जनजातीय स्वातंत्र्यवीर प्रत्येकाला आवर्जून समजावे या उद्देशाने नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक तर्फे तब्बल २०० हुन अधिक महिला कलाकार व ललित कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे येऊन ही रांगोळी साकारली होती. एकूणच सकारात्मक ऊर्जेने मी चे आम्ही मध्ये परावर्तन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
वर्षानुवर्षाच्या उपेक्षेमुळे काहीसा दुर्लक्षित व तत्कालीन इतिहासात तेजोभंग करण्यात आल्याने मागे पडलेला जनजाती समाज आज मात्र कात टाकल्याप्रमाणे एका नव्या चैतन्याने प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होताना दिसत आहे. समाजातील व्यापून टाकणारी नवनवीन क्षेत्रे ज्या गतीने व उत्साहाने हा समाज पादाक्रांत करतांना दिसत आहे, ती पाहता हाच का तो समाज ? असा प्रश्न पडून आपल्याला सार्थ अभिमान वाटतो.
स्वातंत्र्य लढ्यातील जनजाती समाजाचे योगदान अनुभवताना साध्या भोळ्या वाटणाऱ्या सामान्य दिसणाऱ्या जनजाती तरुणांनी जो अचाट पराक्रम गाजवला, आपल्या या धरतीमातेच्या रक्षणासाठी – तिच्यावर आलेल्या परकीय संकटाचे निवारण करण्यासी ज्या उत्कट देशभक्तीचा परिचय दिला. त्याला इतिहासात खरोखर तोड नाही.
जनजाती समाजाबद्दलची कृतज्ञता शतपटीने वाढेल असे एकापेक्षा एक सरस योद्धे भूमीने अनुभवल्याचे दिसते. म्हणूनच या वर्षीची जनजातीय वीर योद्धयांना समर्पित महारांगोळी म्हणजे क्रांतिकारक खाज्या नाईक , राजा जगतदेव सिन्हा, राणी दुर्गावती, बाबुराव शेडमाके, राणा पुंजा भिल, नाग्या कातकरी, तंट्या भिल, राघोजी भांगरे, राणी गाईडीनल्यु, क्रांतिकारक भागोजी नाईक आणि भगवान बिरसा मुंडा अशाच काही जनजाती योध्दांचा परिचय करून देण्याचा एक अल्पसा प्रयत्न करण्यात आला आहे.
रांगोळीच्या पोर्ट्रेट सोबतच या योद्धयांचे माहिती फलक देखील तेथे लावण्यात आले आहे. जनजातीय वीरांचा हा वारसा शहरातील नागरीकांसमोर मांडण्याचा व त्यातून शहरवासी, वनवासी, आम्ही सारे भारतवासी हा संकल्प दृढ करण्यासाठी या महारांगोळीचे प्रयोजन करण्यात आले होते.या महा रांगोळी साठी एकूण ३००० किलो रंग आणि २००० किलो रांगोळीचा वापर करण्यात आला असून १५० महिलांनी तीन तासांत ही रांगोळी साकारली आहे.
या महारांगोळीची संकल्पना पूर्णत्वास उतरवण्यासाठी निलेश देशपांडे आणि तुषार मिसाळ व वनवासी कल्याण आश्रम, नाशिक विभागातील कार्यकर्त्यांचे मोलाचे मार्गदर्शन होते.यावेळी सौ.भारती सोनवणे यांनी महारांगोळी प्रमुख म्हणून काम पहिले तर सौ. मंजुषा नेरकर व सौ.सरोजिनी धानोरकर यांनी सहप्रमुख म्हणून काम पहिले.