आपण भाडेकरू आहात, मालक नाही, याचे भान ठेवून मायमर मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापनाने, डॉक्टरांनी व कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवा करावी, या शब्दात तळेगाव दाभाडे येथील राजघराण्यातील सरदार सत्यशीलराजे दादाराजे दाभाडे यांनी मायमर मेडिकल कॉलेज व्यवस्थापनाला ठणकवले. आयसीयूमधील रुग्णाच्या आत्महत्येच्या प्रकरणी पोलिसांनी सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
तळेगाव दाभाडे जनरल हॉस्पिटल ज्या जमिनीवर उभे आहे, ती जमीन माझे पणजोबा व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत सरदार यशवंतराव खंडेराव दाभाडे यांनी स्वतःच्या मालकीची जमीन मावळ तालुक्यातील व इतर पंचक्रोशीतील रुग्णांच्या सोयीसाठी व उपचारांसाठी भाडेतत्त्वावर दिली होती. या जमिनीवर मायमर मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल उभे आहे. कोविड-19 च्या महामारीत या हॉस्पिटलमध्ये सुरु असलेल्या गैर व चुकीच्या घटनांच्या बातम्या ऐकण्यात व वाचनात येत आहेत, असे दाभाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा देह त्यांच्या नातेवाईकांना न देणे, भाडेतत्त्वावर असलेल्या लोकांनी स्वतःचा मालकी हक्क गाजविणे, स्थानिक समाजसेवक व आमदारांना डावलणे, त्यांचे फोन न घेणे, जनतेबरोबर उर्मटपणे बोलणे, हे अतिशय खेदजनक व दुर्दैवी आहे, असे दाभाडे यांनी म्हटले आहे.
एका कोविड रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त वाचनात आले आहे. हा रुग्ण आयसीयूमध्ये होता. अशा वेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर व स्टाफ काय करत होते, की तिथे उपस्थितच नव्हता, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
ज्या दृष्टीकोनातून सरदार यशवंतराव दाभाडे यांनी हॉस्पिटलला जमीन दिली, तोच दृष्टीकोन ठेवून हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर्स व स्टाफने रुग्णसेवा करावी, अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली आहे.