जेष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्रा. डॉ. कृष्णा किरवले यांची हत्या

शनिवार, 4 मार्च 2017 (10:03 IST)
जेष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्रा. डॉ. कृष्णा किरवले यांची हत्या झाली आहे. कोल्हापुरातील म्हाडा कॉलनी परिसरातील राहत्या घरी ही घटना घडली. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. डॉ. कृष्णा किरवले हे 2012 साली जळगावात पार पडलेल्या 31 व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आंबेडकरी जलसावर त्यांनी ऐतिहासिक संशोधन केले असून, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक म्हणूनही त्यांची ओळख होती. डॉ. गंगाधर पानतावणे यांना ते आपले गुरु मानत.
 
दलित चळवळ आणि साहित्य, समग्र लेखक बाबुराव बागुल अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. शिवाजी विद्यापीठात मराठी विभागाच्या प्रमुखपदाची धुराही त्यांनी काही काळ सांभाळली. आंबेडकरी चळवळीतील ‘थिंक टँक’ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. सुतारकाम करणाऱ्या व्यक्तीनं डॉ. किरवले यांची हत्या केल्याचा संशय आहे. किरकोळ कारणातून डॉ. किरवलेंची हत्या झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

वेबदुनिया वर वाचा