महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
जाणून घेऊया या दिवसाचे महत्त्व...
स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. मात्र राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देणं नाकारलं होतं. आपली मुंबई हिसकावून घेण्याची चिड मराठी माणसांमध्ये धुमसत होती. २१ नोव्हेंबर १९५६ रोजी सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांचा एक भव्य मोर्चा फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात जमला. प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत होता. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. तरी पोलिसांना हा मोर्चा आवरेना. पोलिसांचे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले.