मुंबई ट्रान्स हार्बर लिंक : शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूची काय आहेत वैशिष्ट्यं? वाचा
शुक्रवार, 12 जानेवारी 2024 (12:45 IST)
मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू आता लवकरच लोकांसाठी खुला होतो आहे. हा पूल कसा आहे, त्याची वैशिष्ठ्य काय आहेत आणि त्यामुळे पर्यावरणावर काही परिणाम झाला आहे का, जाणून घ्या.
मुंबई पारबंदर प्रकल्पातल्या या पुलाला 'अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी न्हावा शेवा अटल सेतू' असं नाव देण्यात आलं असून, या नव्या मार्गामुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर केवळ 20 ते 22 मिनिटांत पार करता येईल, असं सांगितलं जातंय.
एकूण 22 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावरचा 16.5 किलोमीटरचा भाग हा समुद्रात आहे. तर जमिनीवरील पुलाची लांबी सुमारे 5.5 किमी इतकी आहे.
या पुलावर सहा पदरी रस्ता आहे, तसंच मुंबई शहरातील शिवडी व शिवाजी नगर आणि राष्ट्रीय महामार्ग-4 ब वर चिर्ले गावाजवळ आंतरबदल (इंटरचेंज) आहेत.
24 मे 2023 रोजी या प्रकल्पाची पाहणी केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, “या प्रकल्पामुळे इंधन वाचेल, वेळ वाचेल, आम्ही हा प्रकल्प मुंबई पुणे हायवेवर कनेक्ट करू, तिथे जवळ लॉजिस्टिक पार्क होईल तिथे लोक येतील, राहतील, लोकांना फायदा देणारा गेम चेंजिंग प्रकल्प आहे. आम्हाला अतिशय अभिमान आहे या प्रकल्पाचा.” असं यांनी यावेळी बोलताना म्हटलं.
मुंबई महानगर विकास प्राधिकरण अर्थात MMRDAनं या पुलाचं बांधकाम केलं आहे.
प्रकल्पाचे फायदे
या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळापर्यंत वेगानं पोहोचणं मुंबईकरांना शक्य होईल तसंच मुंबई पोर्ट आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट यांच्या दरम्यानही वेगवान दळणवळण शक्य होईल, असं सरकारचं म्हणणं आहे.
तसंच या मार्गामुळे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील प्रदेशाचा भौतिक आणि आर्थिक विकास होईल, अशी अपेक्षा केली जाते आहे.
मुंबई व नवी मुंबई, रायगड, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई गोवा महामार्ग यांच्यामधील अंतर सुमारे 15 किमी कमी होईल.
त्यामुळे इंधन, वाहतूक खर्च आणि मौल्यवान वेळेत सुमारे एक तासाची बचत होऊ शकते. तसंच मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊ शकते, असा दावा केला जातो आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्यं
मुंबई पारबंदर प्रकल्प हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरी सेतू आणि जगभरातील 10 व्या लांबीचा पाण्यावरील पूल आहे.
हा पूल बांधताना ऑर्थोट्रॉपिक स्टील डेस्क पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा भारतात प्रथमच वापर करण्यात आला आहे. MMRDAनं दिलेल्या माहितीनुसार या पुलाच्या बांधकामासाठी जे ऑर्थोट्रॉपिक स्टील वापरलं गेलं, त्याचं वजन 500 बोईंग 747 विमानांच्या वजनाइतकं (सुमारे 85000 मेट्रिक टन एवढं) आहे.
सुमारे 1.70 हजार मेट्रिक टन (आयफेल टॉवरच्या वजनाच्या 17 पट) स्टीलच्या सळ्यांचा प्रकल्पात वापर पुलासाठी झाला आहे.
पृथ्वीच्या व्यासाच्या चार पट म्हणजेच सुमारे 48,000 किमी लांबीच्या प्रिस्ट्रेसिंग वायर्सचा यात वापर झाला आहे.
तर अमेरिकेत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा पुतळा उभारण्यासाठी वापरलेल्या काँक्रीटच्या सहापट म्हणजेच सुमारे 9,75,000 घनमीटर काँक्रिट यासाठी लागलं
दुबईतील बूर्ज खलिफाच्या 35 पट उंचीच्या म्हणजेच सुमारे 35 किमी लांबीच्या पाईल लाईनर्सचा यात वापर झाला आहे.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उदघाटन?
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, "आपण आतापर्यंत अनेकदा पाहिलं की, निवडणुकीच्या तोंडावर राज्यकर्ते मोठमोठ्या प्रकल्पांची उद्घाटनं करत असतात."
" हा प्रकल्प केवळ मुंबईकरांसाठी उपयुक्त नाहीय तर नवी मुंबई, रायगड, पुणेकरांसाठी फायद्याचा आहे. पुढे हा मार्ग पुण्याला जोडला जाणारा आहे. त्यामुळे मुंबईसह इतरही जिल्ह्यातल्या मतदारांसाठी प्रकल्पाचं महत्त्व पटवून दिलं जाईल," असंही ते म्हणाले.
MMRDA नं दावा केला आहे की हा पूल बांधताना प्रकल्पबाधितांचं पुनर्वसन करण्यात आलं असून प्रकल्पबाधित मच्छिमारांना शासनाच्या धोरणानुसार नुकसानभरपाई देण्यात आली आहे आणि देण्यात येतही आहे.
फ्लेमिंगोंवर परिणाम होणार?
ज्या शिवडी जेट्टीपासून या पुलाची सुरुवात होते, त्याठिकाणी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) तर्फे दरवर्षी फ्लेमिंगो फेस्टिवलचं आयोजन केलं जायचं
पण पुलाच्या बांधकामामुळे बांधकामामुळे 2016 पासून हे फेस्टिवल आयोजित करता आलेल, अशी माहिती (BNHS) चे उप संचालक राहुल खोत यांनी 2023 मध्ये बीबीसी मराठीशी बोलताना दिली होती.
ते म्हणाले होते, "आम्ही सातत्याने एमएमआरडीएला सूचना करत आहोत की सी लिंकचे बांधकाम करत असताना कुठेही डम्पिंग होणार नाही, पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच कुठल्या प्रकारच्या लाईट्स वापराव्यात याचाही सल्ला आम्ही दिला आहे."
सी लिंकचे बांधकाम सुरू झाल्यापासून BNHS या शिवडी जेट्टी, ठाणे खाडी, भांडुप पम्पिंग स्टेशन या भागातील फ्लेमिंगो आणि इतर पक्ष्यांचा अभ्यास करत आहे.
राहुल खोत सांगतात," आम्ही आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणानुसार, शिवडी जेट्टी भागात दीड लाखापेक्षा जास्त फ्लेमिंगोची नोंद झालीय. 1 लाखापेक्षा अधिक इतर पक्ष्यांची नोंद केली आहे. 2017 पूर्वी याचा नेमका अंदाज नव्हता. त्यावेळी 40 ते 60 हजार फ्लेमिंगो असावेत असा अंदाज होता."
"सी लिंकच्या बांधकामामुळे निश्चितच फ्लेमिंगो आणि पक्ष्यांचं काही प्रमाणात विस्थापन झालं आहे. आम्ही दर महिन्याला याचा सर्वे करत आहोत. फ्लेमिंगो आणि पक्ष्यांचं ट्रॅकींग केलं जात आहे. तेव्हा प्रकल्पाच्या शेवटी आपल्याला कळू शकेल की किती परिणाम यावर झाला आहे." असंही ते म्हणाले.