मुंबई एअरपोर्टने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यानुसार प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर साडेतीन तास अगोदर पोहोचावे लागले, तर देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांना अडीच तास आधीच पोहोचावं लागणार आहे. विमान प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीमुळे मुंबई विमानतळ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. विमानतळावर होणाऱ्या गर्दीचा नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आढावा घेतला होता. यानंतर प्रवाशांसाठी या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
विमानतळावरील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एक बैठक घेतली, यावेळी देशातील सर्व प्रमुख विमानतळांवर सुरक्षा तपासणीसाठी असलेल्या क्षमतेनुसार महत्त्वाच्या उड्डाणकाळांचे नियोजन आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबत सामानाची तपासणी करणाऱ्या मशिनबाबत आढावा घेण्यासही सांगण्यात आले आहे.
31 डिसेंबर आणि न्यू इअरच्या सुट्ट्यांमुळे आधीच मुंबई विमानतळांवर प्रवाशांची गर्दी वाढतेय. येत्या आठवड्यात या संख्येत आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ ठेवावा अशी मागणी केली आहे. यामुळे केंद्र सरकारने विमानतळांवर प्रवाशांच्या गर्दीमुळे खोळंबा होऊ नये आणि विमान वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी नियोजन कराव्या अशा सुचना सर्व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
विमानतळांवरील समस्यांबाबत गुरुवारी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी लोकसभेत माहिती दिली. इमिग्रेशन, विमानतळ सुरक्षा पाहणारे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि इतर यंत्रणांशी चर्चा केली. यानंतर विमानांचे आगमन आणि उड्डाणांचे बारकाईने नियोजन करण्याच्या सूचना ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्या आहेत.