खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले

बुधवार, 21 डिसेंबर 2022 (21:00 IST)
खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’नावाने 44 वेळा फोन आले. ‘एयू’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा होतो, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केला आहे. शेवाळे यांच्या आरोपानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.
 
यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल शेवाळे म्हणाले की, “सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाची माहिती अद्याप जनतेपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरं जनतेला मिळायला पाहिजे. रिया चक्रवर्तीवर एनसीबीने कारवाई केली. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. ड्रग्जसंदर्भातील चर्चा सुरू असल्याने या प्रकरणाचा उल्लेख अनेक खासदारांनी आणि मीही केला. पण सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाला फोन कॉल आले होते. याचा उल्लेख बिहार पोलिसांच्या तपासातून समोर आला आहे. ते कॉल ‘एयू’(AU)या नावाने आले होते.”
 
“रिया चक्रवर्तीच्या कायदेशीर टीमने ‘एयू’चा अर्थ ‘अनन्या उद्धव’असा लावला. तर मुंबई पोलिसांनी याबाबत कुठलाही खुलासा केला नाही. पण बिहार पोलिसांनी जो तपास केला, त्यानुसार ‘एयू’चा अर्थ ‘आदित्य उद्धव ठाकरे’ असा होतो. ही माहिती मला मिळाली आहे. सीबीआयने याबाबत कुठलीही माहिती अद्याप समोर आणली नाही. त्यामुळे या प्रकरणातील खरी माहिती काय आहे? हे समोर यावी, याची विनंती मी गृहमंत्र्यांकडे केली आहे.”
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती