खासदार नवनीत राणा यांना शिवजी महानगर दंडाधिकारी कोर्टाचा मोठा धक्का बसला आहे. नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कौर यांना शिवडी कोर्टाकडून फरार म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच राणा आणि त्यांच्या वडिलांना 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जात पडताळणी प्रकरण नवनीत राणा यांना चांगलेच भोवताना दिसत आहे.
काय आहे प्रकरण?
नवनवीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवनीत राणा यांचे वडिल हरभजन सिंग कौर यांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलां विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी हरभजनसिंह यांच्याविरोधात कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. मात्र, त्यांनी कोर्टात हजेरी लावली नाही. त्यामुळे आता कोर्टाने त्यांना फरार घोषित केले असून आता हरभजनसिंह यांच्या निवासस्थानी कोर्टाची नोटीस लावण्यात येईल.
सुप्रीम कोर्ट आणि मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेलं प्रकरण दोन्हीही वेगवेगळे असल्याचं निरीक्षण शिवडी कोर्टाने नोंदवलं आहे. कोर्टाने आता एक महिन्याची मुदत दिली आहे, या कालावधीत हजर न झाल्यास प्रॉपर्टी जप्त करण्यात येण्याची शक्यता आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 16 फेब्रुवारीला आहे.