केरळ मध्ये यंदा मान्सून लवकर दाखल झाल्यावर अखेर महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून पावसाच्या सरी कोसळणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. शेतकऱ्यांनी आपापली पेरणीची कामे करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सोलापूर, सातारा, सांगली भागात मान्सूनने उपस्थिती दर्शवली आहे. या भागात पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ झाली. येत्या दोन दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 3 दिवसांत विदर्भ, मुंबई, मराठवाड्यात पावसाची हजेरी लागणार आहे. शनिवार पासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज शुक्रवार रोजी मराठवाडा, कोकण, मुंबई मध्यमहाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
आज पुणे, ठाणे, मुंबई, कोकणातील काही जिल्ह्यात, पालघर नाशिक, जळगावश उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
तसेच छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, नांदेड, धाराशिव, बीड, जिल्ह्यात पावसाची हजेरी लागणार आहे. विदर्भात यवतमाळ, अमरावती, वाशीम, अकोला, चंद्रपुरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.