युद्धाच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहखात्याने देशभरातील नागरी सुरक्षेसाठी विशेष तयारी सुरू केली असून देशातील सर्व राज्यांना उद्या 7 मे रोजी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहे. या काळात, युद्धसदृश परिस्थितीत हवाई हल्ल्यांचा इशारा देणारे सायरन वाजवले जातील, ब्लॅकआउट कसे करावे, सुरक्षित ठिकाणी कसे पोहोचावे इत्यादी प्रशिक्षण माहिती दिली जाईल.
केंद्रीय गृहखात्याच्या आदेशानुसार, महाराष्ट्र सरकार देखील मॉक ड्रिल साठी सज्ज आहे. राज्य प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनाशी समन्वय राखण्यास सांगण्यात आले आहे.
राज्य सरकारने 7 मे रोजी मॉक ड्रील आयोजित केलेल्या 16 ठिकाणांची यादीही प्रसिद्ध केली आहे, ज्यात मुंबई, ठाणे, पुणे, उरण-जेएनपीटी, तारापूर, नाशिक, थळ-वायशेत (अलिबाग), रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. या ठिकाणी मॉक ड्रिल आणि ब्लॅक आउट होणार आहे.
युद्धासंदर्भात महाराष्ट्रात अशा प्रकारचे सराव होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धापूर्वीही, राज्यभर मॉक ड्रिल आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या वेळीही शहरांमध्ये सायरन वाजवले जात होते, ब्लॅकआउट ड्रिल केले जात होते आणि लोकांना सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.