बैलपोळा साजरा करा, मनसे शेतकऱ्यांसोबत

शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (15:14 IST)
‘शेतकऱ्यांनी बैलपोळा साजरा करावा, मनसे शेतकऱ्यांसोबत’, मनसैनिक स्वत: गावात जावून बैलपोळा साजरा करणार असल्याची माहिती मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिला आहे.
 
कोरोनाचे संकट बघता राज्य सरकारनं दहीहंडी साजरी करु नका, असं आवाहन केल्यानंतरही मनसेनं आक्रमक भूमिका घेतली होती आणि  मुंबईत अनेक ठिकाणी दहीहंडी साजरी केली होती. आता विदर्भात बैलपोळा सणावर निर्बंध आणल्याने मनसे नेते संतप्त झाले आहेत. निर्बंधानंतरंही मनसेने बैलपोळा सण साजरा करण्याचा इशारा दिला आहे. 
 
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यात यंदा मोठा आणि तान्हा पोळा भरणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले असताना मात्र विदर्भात पोळा साजरा करण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. 
 
मनसेनं मेळावे, उद्घाटन कार्यकर्ता संमेलन चालतात, मग हिंदूंच्या सणावर बंदी का? असा सवाल उपस्थित केला आहे. येत्या सोमवारी बैलपोळा साजरा करण्यावर मनसे ठाम असल्याचं राजू उंबरकर म्हणाले आहेत.
 
नागपूरसह विदर्भातील बऱ्याच जिल्हयात शेतकऱ्यांच्या बैलपोळा सणावर निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने सण साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. हा सण घरीच साजरा करुन बैलांच्या मिरवणूका काढण्यात येऊ नये तसेच कोरोना विषाणु प्रादुर्भावासाठी शासनाने केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती