कोरोना काळातील वीज बिले कमी करण्यात यावी यासाठी मनसेकडून आज आंदोलन करण्यात आले आहे. राज्यभरात वीजबिलाविरोधात महामोर्चा काढण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये मनसेचे शेकडो कार्यकर्ते वीजबिलमाफीची मागणी करत रस्त्यावर उतरले आहेत.
ठाण्यात मनसेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे देखील समोर आले आहे. यावेळी संदीप देशपांडे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार बोलतात, राजकारण करू नका. मात्र आम्ही बोललो की राजकारण आणि हे करतात ते समाजकारण असं संदीप देशपांडे यांनी सांगितले. तसेच वीज बिल मागायला कोण आलं तर त्याच्या कानाखाली जो शॉक बसेल त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा देखील संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
मुंबई, ठाण्यासह पुणे, नाशिक, नागपूरमध्येही मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलं होतं. पुण्यात मनसेच्या मोर्चाला सुरुवात होण्याआधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली होती. तर मनसेचा गड मानला जाणाऱ्या नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणावर मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. नागपुरात देखील मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वाढीव वीजबिला संदर्भातील निवेदन दिले.