मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. रवींद्र वायकर हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण हाती घेतला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निष्ठावान समजल्या जाणाऱ्या आमदाराने साथ सोडल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.
मागील काही महिन्यांपासून रवींद्र वायकर यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता. जोगेश्वरी येथे एका तारांकित हॉटेलच्या बांधकाम व व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून ही चौकशी सुरू होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ९ जानेवारी रोजी वायकर यांचे निवासस्थान, मातोश्री क्लब तसेच त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या निवासस्थानी अशा एकूण ७ ठिकाणी छापेमारी केली होती. जोगेश्वरी पूर्व येथील एका भूखंडावर बांधकाम होत असलेल्या पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामाकरिता वायकर यांनी त्यापूर्वीचे काही करार लपवल्याचा आरोप होता.