आमदार-खासदारांना पळसे गावात बंदी, "हे" आहे कारण

गुरूवार, 19 ऑक्टोबर 2023 (21:33 IST)
जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत विद्यमान आमदार व खासदार यांना पळसे गावात बंदी असल्याची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
 
या पोस्टमध्ये म्हटले आहे, की मराठा मतदार, मराठा अस्मिता यावर निवडून आलेले विद्यमान खासदार व विद्यमान आमदार यांनी आजवर कधीही मराठा आरक्षण या विषयावर तोंड उघडले नाही. लोकसभा व विधानसभेच्या सभागृहात एकदाही प्रश्न उपस्थित केल्याचे ऐकिवात नाही. आपण सर्व मराठा बांधव त्यांना जाब विचारूया. आपण सर्व बांधव मतदान करताना जातीच्या व पक्षाच्या मुद्यावर एक होतो; मात्र जातीची माती करणाऱ्या व मराठा मतांवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांनी मतदान मागताना यानंतर हजारदा विचार करावा.
 
जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमदार व खासदारांनी गावात फिरकू नये; अन्यथा गंभीरपणे परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा सकल मराठा समाज, पळदसे गाव यांच्या वतीने यातून देण्यात आला आहे.
 
आज दुपारी साडेचार वाजता केंद्र शासनाच्या प्रमोद महाजन ग्रामीण विकास केंद्र या केंद्राच्या ऑनलाईन उद्घाटनासाठी आ. सरोज अहिरे व खा. हेमंत गोडसे हे पळसे गावात येतात का, यावर आता लक्ष लागून आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती