कोल्हाट्याचं पोरचे लेखक दिवंगत डॉ. किशोर शांताबाई काळे यांच्या आई आयुष्यभर भाड्याच्या घरात राहात आल्या आहेत. स्वतःचं हक्काचं घर मिळावं यासाठी त्या गेली अनेक वर्ष वणवण फिरत आहेत. त्यांचा मुलगा म्हणजेच डॉक्टर किशोर शांताबाई काळे यांचं अपघाती निधन झाल्यानंतर शांताबाई कोलमडून पडल्या. तब्बल ४० वर्षे लावणी कला जोपासणाऱ्या आणि लावणी करून आपल्या मुलाला लहानाचा मोठा करून डॉक्टर बनवणाऱ्या शांताबाईंचा वनवास अजून संपलेला नाही. मुलाच्या निधनानंतर त्या अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत.
निवृत्त कलावंत म्हणून मिळणारे १,५०० रुपये मानधन आणि डॉक्टर काळे यांच्या पुस्तकाची रॉयल्टी एवढ्यावरच त्या त्यांचा दैनंदिन उदरनिर्वाह करत आहेत. अनेकदा कलावंतांचं मानधनही वेळेवर मिळत नाही. घराचं भाडं द्यावं की पोट भरावं असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो.
शांताबाईंना न्याय मिळणार
स्वतःचं घर मिळावं यासाठी त्या अधिकारी, मंत्री, आमदारांच्या कार्यालयांचे हेलपाटे मारत आहेत. त्यांना प्रत्येकाकडून केवळ आश्वासनं पण हक्काचं घर काही मिळालं नाही. परंतु आता शांताबाई काळे यांचा वनवास संपेल असं दिसतंय. कारण आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून शांताबाई काळे यांनी घर बांधून दिलं जाणार आहे.