महाराष्ट्र विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहाप्रमाणे दिल्लीतील नवीन संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्रामुळे संसद भवनामध्ये येणाऱ्या लोकप्रतिनिधींना सदैव प्रेरणा आणि स्फूर्ती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राची अस्मिता असलेले शिवसेनाप्रमुख आणि प्रसिद्ध संपादक, व्यंगचित्रकार, लेखक, सामना वृत्तपत्राचे संस्थापक तसेच एक प्रखर हिंदुत्ववादी व्यक्तिमत्त्व अशी बाळासाहेब ठाकरे यांची ओळख अखंड हिंदुस्थानाला आहे. मराठी माती आणि मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. जगाच्या पाठीवर असे काही प्रभावी नेते होऊन गेले, त्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र नवीन संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये लावण्याची नितांत आवश्यकता आहे, असे भुजबळ यांनी पत्रात नमूद केले आहे.