यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. रुग्ण वाढत असल्याने खबरदारीचे उपाय म्हणून शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या दर्शन रांगेच्या प्रवेशद्वाराजवळ भाविकांना मास्क देण्याच्या सुविधा उपलब्ध करूनच दर्शनासाठी प्रवेश द्यावा. ज्या भाविकांकडे मास्क नसेल. त्यांना दर्शनासाठी प्रवेश देऊ नये, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई संस्थान प्रशासनाला दिल्या आहेत.
शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि ग्रामस्थांना प्रवेशद्वाराजवळच मास्क देण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवळे यांना दिली आहे. या सूचनेची अंमलबजावणी आजपासूनच केली असल्याने आता दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांना तसेच ग्रामस्थांनादेखील मास्क वापरणे बंधनकारक आहे.
सध्या सुटीचे दिवस असल्याने नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे खबरदारीच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. केरळमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने तिथे जास्त प्रादुर्भाव वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना नियमांचे पालन करण्याबरोबरच चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.