पावसाचे सावट ! थंडी आणखी वाढणार अंदाज उत्तर-पश्चिम आणि लगतच्या मध्य भारताच्या काही भागात दाट धुके

बुधवार, 27 डिसेंबर 2023 (17:06 IST)
राज्यासह देशात तापमानात मोठी घसरण झाली आहे. राज्यासह देशात गारठा वाढला आहे. वर्षाअखेरपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार आहे. काश्मीर खो-यात पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टी सुरू असल्याने उत्तर भारतात थंड वारे वेगाने वाहत आहे. परिणामी उत्तर भारतासह महाराष्ट्रातील तापमानातही घट झाली आहे. दरम्यान, राज्यात काही तुरळक ठिकाणी पावसाची रिमझिम होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील 3 ते 4 दिवसांत उत्तर-पश्चिम आणि लगतच्या मध्य भारताच्या काही भागात दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे.
 
राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पारा कमालीचा घसरला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पालघर जिल्ह्यात पहाटे आणि रात्रीच्या वेळी तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे, पण राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये तापमानात चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तरेकडून येणा-या वा-यांमुळे उत्तर महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यातही थंडी जाणवत आहे. राज्यातील वर्षाअखेरपर्यंत असेच तापमान राहण्याचा अंदाज आहे.
 
दक्षिण भारतात पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज दक्षिण भारतात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज तामिळनाडू, पुद्दुचेरी या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे दक्षिण भारतात मुसळधार पाऊस होऊन पूरस्थिती निर्माण झाली होती. आता तामिळनाडूमधील जनजीन पूर्वपदावर येत असताना आयएमडीने आज पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
 
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा घसरला
उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही हळूहळू तापमानाचा पारा घसरताना दिसत आहे. विदर्भातील अनेक जिल् ंमधील किमान तापमान १२अंशाखाली पोहोचले आहे. नागरिक गरम कपडे आणि शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिममधील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. याशिवाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा चांगला घसरला आहे.
 
नाताळनंतर तापमानात घट होण्याचा अंदाज
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय वेस्टर्न डिर्स्टबन्समुळे देशासह राज्याच्या हवामानावर परिणाम होताना दिसत आहे. आता काही दिवस तापमानात घट होताना दिसेल. २५ डिसेंबरनंतर वेस्टर्न डिस्टबर्न्स तसेच उत्तरेकडील वा-यांमुळे तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. वर्षाअखेरसह नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती