मराठा आरक्षणासाठी राज्यभर चक्काजाम आंदोलन

मराठा आरक्षणाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच विविध मागण्यांसाठी सकल मराठा मोर्चातर्फे मंगळवारी राज्यभर विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलनही यापूर्वी करण्यात आलेल्या महामूक मोर्चाप्रमाणे शांततेत केले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
 
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डीमध्ये झालेल्या बलात्कारामधील आरोपींना फाशी द्यावी, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागण्या घेऊन हे चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने आंदोलन होण्यासाठी ठरविलेल्या ठिकाणीच आंदोलने केली जातील. आंदोलनासाठी आयोजकांनी आचारसंहिता तयार केली असून त्याप्रमाणेच हे चक्क जाम आंदोलन करण्यात येणार आहे. शिस्तबद्ध आंदोलन करणे, कोणीही गालबोट लावू देऊ नका, गालबोट लावणाऱ्या संशयिताची माहिती पोलिसांना द्या, वाहनांवर दगडफेक करू नका, वाहनांची हवा सोडू नका, रस्त्यावर टायर पेटवू नका, अग्निशमन दल, रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करून द्या, पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा