सावकारांच्या जाचाला इसमाची कंटाळून आत्महत्या

गुरूवार, 24 मार्च 2022 (09:16 IST)
सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.या घटनेमुळे नाशिकमध्ये अवास्तव व्याज आकारणाऱ्या सावकारांच्या सुळसुळाटावर शिक्कामोर्तब झालं आहे. व्याजाने पैसे घेतलेल्या इसमाला शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन खासगी सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की…
फिर्यादी प्रणाली दिलीप रौंदळ (रा. तलाठी कॉलनी, तारवालानगर, दिंडोरी रोड) यांचे वडील दिलीप दयाराम रौंदळ यांनी आरोपी अरुण बोधले, विजय लहामगे व चंद्रेश लोढया (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. आरोपींनी रकमेच्या वसुलीपोटी दिलीप रौंदळ यांचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. सावकारांकडून वारंवार होणार्‍या छळाला कंटाळून अखेर रौंदळ यांनी औरंगाबाद रोडवरील खुशाल ट्रान्स्पोर्ट, मिरची हॉटेल चौकाजवळ आत्महत्या केली.
 
दरम्यान ही बाब लक्षात आल्यानंतर आडगाव पोलीस ठाण्यात मृत रौंदळ यांची मुलगी प्रणाली रौंदळ हिने आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपी अरुण बोधले, विजय लहामगे व चंद्रेश लोढया या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तोडकर करीत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती