दिल्लीहून विशेष पथक आले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनिफ शेख विरुद्ध दिल्लीतील न्यू फ्रंट कॉलनी पोलिस ठाण्यात 2001 मध्ये UAPA आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. 2001 मध्ये घडलेला हा गुन्हा 'सिमी' या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे हनिफचा माग काढला.
भुसावळमध्ये खळबळ
गुरुवारी दुपारी दिल्लीहून आलेल्या पोलिस पथकाने बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने हनिफला दत्तनगर मेहराज बिल्डिंग, खडका रोड, भुसावळ येथून पकडले. या टीममध्ये दिल्ली स्पेशल सेलचे इन्स्पेक्टर पवन कुमार, एसआय सुमित, नवदीप यांच्यासह एकूण 15 पोलिस होते. अचानक झालेल्या या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
काय आहे आरोप?
23 वर्षांपूर्वी दहशतवादी संघटना सिमीच्या इस्लामिक मूव्हमेंट मासिकात भडकाऊ लेख लिहिल्याबद्दल दिल्लीत हनिफ शेखवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिल्ली न्यायालयाने शेखला 2002 मध्ये फरार घोषित केले होते. दरम्यान संशयित भुसावळ येथे असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली. त्याला अटक करण्यासाठी स्पेशल सेलचे 15 अधिकारी व कर्मचारी भुसावळात आले होते.