पेपटफुटी प्रकरणामागे महेश बोटले आणि 'न्यासा'चाच हात
बुधवार, 29 डिसेंबर 2021 (09:13 IST)
आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. गट ड बरोबरच गट कचेही पेपर फुटले असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. आणखी दोन मुख्य दलालांना अटक झाल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
आरोग्य विभागाचे सहसंचालक महेश बोटले आणि परीक्षेची जबाबदारी असलेल्या न्यासा कंपनी यांनीच हे पेपर फोडले असल्याचं आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालं आहे.
दरम्यान, गट क चा पेपर फुटल्याची माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणीदेखील सायबर पोलिसांनी आणखी एक स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेले नवे दोन दलाल हे अमरावती येथील आहेत.
बोटले आणि न्यासा कंपनीनेच पेपर फोडल्याचं तपासात निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. गट ड च्या प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 92 प्रश्न त्यांनी फोडले होते, अशी माहिती समोर आली आहे.