शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे लघुपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करणार थेट प्रक्षेपण

बुधवार, 29 डिसेंबर 2021 (08:37 IST)
आपली मराठी भाषा अभिजात कशी आहे, याची सर्वांना कल्पना यावी, यासाठी  राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे’, हा लघुपट नवीन वर्षाचा पहिल्या सोमवारी दि. 03 जानेवारी 2022 रोजी संध्याकाळी 6.00 वाजता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय थेट प्रक्षेपित करणार आहे. हा लघुपट महासंचालनालयाच्या पुढील  लिंकवरून पाहता येणार आहे.
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक –https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मराठी भाषा कशी पात्र आहे याचे महत्व अधोरेखित करणारा हा लघुपट मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून  तयार करण्यात आला आहे. राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभागाच्या या लघुपटात कोर्टाच्या देखाव्यातून जुन्या जाणत्या  साहित्यिकांना व तज्ज्ञांना बोलावून मराठी भाषेच्या अभिजातपणासंदर्भात त्यांची साक्ष नोंदविण्याचा रंजनात्मक प्रयोग करण्यात आला आहे. सुमारे दोन हजार वर्षापूर्वीच्या मराठी भाषेच्या प्रवासादरम्यानची माहिती देणाऱ्या विविध सबळ पुराव्यांचे नाट्यमय सादरीकरण या लघुपटात करण्यात आले आहे.
नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सलग तीन दिवस हा लघुपट दाखविण्यात आला. याचवेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची विनंती करणारे पत्र पाठविण्याची मोहीम राबविण्यात आली. आतापर्यंत सुमारे साडेदहा हजार पत्रे राष्ट्रपतींना पाठविण्यात आली आहेत.
नुकत्याच नाशिक येथे पार पडलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दि. 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2021 या कालावधीत मराठी भाषा अभिजात कशी आहे, याची ओळख व माहिती करून देणारे असे वैशिष्ट्यपूर्ण दालन मराठी भाषा विभागाच्यावतीने उभारण्यात आले होते, तसेच राज्य मराठी विकास संस्थेने निर्मित केलेला शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे हा लघुपटही यावेळी दाखविण्यात आला.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सदस्यांसाठी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात या लघुपटाचा  विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला होता.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती