महाराष्ट्र अनलॉकः राज्यातील जनतेला दिवाळीनंतर मिळणार मोठी गुडन्यूज

सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (08:56 IST)
ब्रेक द चेन अंतर्गत राज्यातील जनतेला दिवाळीनंतर मोठी गुडन्यूज मिळणार आहे. तसे सुतोवाच आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिले आहेत. राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्य सरकारने टप्प्याटप्प्यांमध्ये कोरोना निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. सर्व धार्मिक स्थळे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून उघडली आहेत. त्यानंतर आता येत्या २२ ऑक्टोबरपासून सर्व सभागृहे, नाट्यगृहे, सिनेमागृहे सुरू होत आहेत. यंदा दिवाळी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आहे. दिवाळीचा सण होताच राज्यातील उर्वरीत निर्बंध शिथील करण्याबाबत निर्णय होणार आहे.
 
त्यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे, ज्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांना जवळपास सर्व ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. त्यात रेल्वे, लोकल, मॉल्समध्ये प्रवेश मिळू शकणार आहे. यासंदर्भात राज्य टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. पहिला डोस घेतलेल्यांच्या आरोग्य सेतू मोबाईल अॅपमध्ये जर सेफ असे स्टेटस दिसत असेल तर त्यांना विविध सवलती मिळू शकतील, असे डॉ. टोपे यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती