महाराष्ट्र पाऊस : पुणे, ठाणे, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा रद्द

बुधवार, 13 जुलै 2022 (23:34 IST)
राज्याच्या विविध भागात चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे, ठाणे, पालघरमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे तर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
 
या पार्श्वभूमीवर पुणे परिसरातील पर्यटनस्थळांवर कलम 144 लागू करून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच पुढील तीन दिवस शाळांनाही सुटी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
 
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत वरील आदेश काढले आहेत.
 
या आदेशानुसार, गुरुवार, 14 जुलै 2022 ते रविवार, 17 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत पर्यटक, गिर्यारोहक आणि ट्रेकर्स यांना पर्यटनस्थळावर प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे.
 
या ठिकाणी वाढते अपघाताचे प्रमाण लक्षात घेत व अपघाताचा संभाव्य धोका टाळण्यासाठी फौजदारी दंड संहितेचे कलम 144 लागू करण्यासंदर्भात वन विभागानेही शिफारस केली आहे.
 
असे असतील प्रतिबंध
* पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील.
* पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.
* धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.
* पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढणे.
* कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
* पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे.
* मद्य बाळगणे, मद्यवाहतूक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे.
* वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहनांची ने आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे तसेच धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे या बाबींना प्रतिबंध करण्यात आला आहे.
 
याशिवाय, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकणे, मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे यांना प्रतिबंध असेल.
 
धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून सर्व दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई जाहीर करण्यात आली आहे.
 
सदर आदेशाचे उल्लघंन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
 
शाळांना सुटी देण्याचे आदेश
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, पुण्यातील इंदापूर, बारामती, दौंड आणि शिरूर हे चार तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांमधील शाळांना सुटी देण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
 
या सर्व तालुक्यांमधील प्री स्कूल, प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक अशा 12 वी पर्यंत सर्व शाळांना सुटी देण्याची सूचना जिल्हाधिकारी देशमुख यांनी केली आहे.
 
पण, शाळांना सुटी असली तरी ती विद्यार्थ्यांना असणार आहे. सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करणे गरजेचे आहे, असंही या आदेशात म्हटलं आहे.
 
पुण्याप्रमाणेच पालघरमध्येही अशाच पद्धतीने शाळा बंद ठेवण्याची सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. इथे 14 आणि 15 जुलै असे दोन दिवस शाळा बंदचा आदेश आहे. तर, मुंबई विद्यापीठाच्या उद्या होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती