परदेशी गुंतवणूक आणि जीडीपीमध्ये देखील महाराष्ट्र नंबर वन वर आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातून लोकसभेच्या 45 प्लस जागा जिंकून देण्यात आणि 'अब की बार 400 पार' करण्यासाठी महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामाचे दुरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या कार्यक्रमास पालकमंत्री शंभूराजे देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र फाटक, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त इंदुरानी जाखड आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे, हे धोरण अवलंबिण्यात आले आहे. आपले सरकार आल्यापासून गेल्या दीड दोन वर्षात राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक चांगली व सक्षम करण्यात येत आहे.