मर्यादेच्या बाहेर गेला की कार्यक्रम करतोच", नेमकं कुणाबद्दल बोलले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (09:23 IST)
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील वातावरण सध्या तापले आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारी सकाळी सुरु झाली. आजच्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर विधानभवनाच्या आवारात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये झालेल्या संभाषणाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संभाषणाचा रोख मनोज जरांगे यांच्या दिशेने होता का, याविषयी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
 
काय संभाषण झाले ?
नाना पटोले आणि एकनाथ शिंदे हे विधानभवनाच्या आवारात एकमेकांसमोर आले. त्यावेळी नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलायला सुरुवात केली. व्हीडिओतील आवाज अस्पष्ट असला तरी या दोघांच्या संभाषणाचा विषय मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील असल्याचे प्रथमदर्शनी सूचित होत आहे. नाना पटोले यांनी खेळीमेळीत, 'हे काय चाललंय?', असा सवाल एकनाथ शिंदे यांना विचारला. त्यावर एकनाथ शिंदेंनी तात्काळ म्हटले की, 'मर्यादेच्या बाहेर गेला की कार्यक्रम करतोच.' यावर नाना पटोले यांनी म्हटले की, मला सांगा, तुम्ही त्याला वाढवलं ना? त्यावर शिंदे यांनी, 'तो सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत ठीक होते', असे म्हणत काढता पाय घेतला. एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याचा रोख मनोज जरांगे यांच्या दिशेने असल्याची चर्चा आता रंगली आहे. त्यामुळे आता मराठा आंदोलक कशाप्रकारे व्यक्त होतात, हे बघणं महत्वाचे ठरेल.

Edited By -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती