Maharashtra Assembly Session :विधिमंडळात गोंधळ का सुरू झाला?
बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (15:08 IST)
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या विधिमंडळाच्या पहिल्या सत्रात आज (24 ऑगस्ट) गोंधळ झाला. सत्ताधारी पक्षातील आमदार आणि विरोधकांमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. ही धक्काबुक्की कुणी सुरू केली यावरून सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. महिला पत्रकारांना धक्काबुक्की झाल्यामुळे हा गोंधळ सुरू झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला तर सत्ताधाऱ्यांनी हा आरोप फेटाळून लावला.
ही धक्काबुक्की कशी झाली याबद्दल शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले की "सत्ताधारी पक्षाचे आमदार राष्ट्रवादीविरोधात आंदोलन करत होतो. आमच्या आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी गाजरं आणली आणि आमच्या आंदोलनात ढवळाढवळ केली."
"सत्ताधारी आंदोलन करत असताना तिथे अमोल मिटकरी आले आणि त्यांनी म्हटले की या आंदोलनामुळे महिला पत्रकारांना धक्काबुक्की झाली आहे. त्यावरून वाद सुरू झाला. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी महिला पत्रकारांना धक्काबुक्की झाली असल्याचे आरोप फेटाळले आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांनी गाजरांची माळ आणली होती. हा देखील वादाचा एक मुद्दा होता."
राष्ट्रवादीचे प्रवक्ते अनिल पाटील यांनी म्हटले की "सत्ताधारी आमदारांनीच ही धक्काबुक्की सुरू केली, पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा सत्ताधाऱ्यांना आवडली नाही. त्यामुळे त्यांनी हे आंदोलन केलं."
शिंदे गटातील आमदारांना प्रत्येकी 50 कोटी रुपये मिळाल्याचा आरोप राष्ट्रवादींचे नेत्यांनी केला होता.
विधिमंडळाचं कामकाज सुरू झालं त्यावेळी पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात धक्काबुक्की झाली. सुरुवात त्यांनी केली असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केला.
'50 खोके आणि ओके वरून राडा'
शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी सांगितले की "आम्ही शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होतो पण आम्हाला राष्ट्रवादीकडून विरोध झाला."
"आज आम्ही पायऱ्यांवरती घोषणाबाजीचा कार्यक्रम ठेवलेला होता. शिवसेना-भाजप युतीचे नेते त्यात सहभागी झाले होते. विरोधी पक्षाचे नेते गेले तीन चार दिवस पायऱ्यांवर बसून आंदोलन करत होते. गद्दार, 50 खोके असं काय काय बोलण्यात आलं. जे काय आम्ही केलं नाही ते आमच्या नावावर लावण्याचा विरोधी पक्षाचा प्रयत्न होता.
"जी वस्तुस्थिती आहे ते समोर यावं यासाठी आम्ही घोषणाबाजी केली. ते आंदोलन करत होते तेव्हा आम्ही मध्ये आलो नाही. त्यांच्याकडे शंभरेक नेते आहेत. आम्ही 170च्या आसपास लोक होते. आम्ही बोलत होतो तेव्हा त्यांनी यायला नको होतं. मिरची जशी झोंबते तसं त्यांना झोंबलं.
"आम्ही त्यांचा इतिहास बाहेर काढला. कोरोना, सिंचन घोटाळा, अनिल देशमुख, नवाब मलिक, सचिन वाझे आम्ही सगळं बाहेर काढलं. आम्ही वस्तुस्थिती मांडायचा प्रयत्न केला. आमचं बोलून झाल्यावर त्यांनी यायला हवं होतं. आम्ही पायऱ्या मोकळ्या करून दिल्या असत्या," असं गोगावले म्हणाले.
गोंधळ घालण्याची त्यांची मानसिकता होती. मीडियाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करायचा. आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत. त्यामुळे जशास तसं उत्तर दिलं. त्यांनी आमचा नाद करू नये", असं शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी सांगितलं.
"आम्ही कुणाला पाय लावत नाही. चुकून पाय लागला तर नमस्कार करतो. पण आम्हाला कोणी पाय लावायचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही. जो येईल अंगावर, त्याला घेऊ शिंगावर", असा इशारा गोगावले यांनी दिला.
बुधवारी सकाळपासून भाजपचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. कोव्हिड भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन या आमदारांनी बॅनर्स झळकावले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांच्या नेतृत्त्वाखालील मविआचे आमदारही त्याठिकाणी आले.
मविआच्या आमदारांनीही फलक झळकावत घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यावेळी मविआच्या आमदारांना गाजराच्या माळा आणल्या होत्या. 'गाजर देणं बंद करा, ओला दुष्काळ जाहीर करा', अशी घोषणाबाजी मविआने केली. हे सगळे सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर आले.
दोन्ही बाजूचे आमदार आक्रमक असल्यामुळे बाचाबाचीचा प्रकार घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी हे रागाच्या भरात सत्ताधारी आमदारांच्या अंगावर धावून जाताना दिसत होते. त्यामुळे विधिमंडळाच्या परिसरात प्रचंड गदारोळ माजला होता. अखेर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मध्ये पडत विरोधी पक्षाच्या आमदारांना बाजूला नेले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.
'50 खोके, एकदम ओक्के घोषणा जिव्हारी'
"50 खोके, एकदम ओके ही घोषणा त्यांच्या फार जिव्हारी लागली. ते नाराज झाले असल्यानेच आज त्यांच्यातील काही आमदार येथे आले असून, घोषणा देत आहेत. विधिमंडळात अशा गोष्टी घडत असतात. पण त्यांच्या वागण्यातून मनाला लागलं असल्याचं स्पष्ट दिसत आहे," अशी प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.
काय घडलं याआधी?
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या चार दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केलेल्या घोषणाबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 'आले रे आले गद्दार आले', '50 खोक्के एकदम ओक्के', 'गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो चले गुवाहाटी', अशा एकापेक्षा एक झोंबणाऱ्या घोषणांनी महाविकास आघाडीने शिंदे गट आणि भाजपला जेरीस आणले होते.
त्यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी होताना दिसत होते. त्यामुळे आता अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी भाजप-शिंदे गटाने आपली रणनीती बदलल्याचे दिसत आहे.
आमदार संजय कुटे आणि भास्कर जाधव यांच्यात धक्काबुक्की-
या पूर्वी देखील गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनात इंपेरिकल डाटावरून विधानसभा अध्यक्षांच्या केबिनमध्ये भाजप आमदार गेले असता, यावेळी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव आणि भाजप आमदार संजय कुठे यांच्यात धक्काबुक्की झाली होती. यासंदर्भात 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. निलंबित आमदारांमध्ये पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांचा समावेश होता.
भास्कर जाधव यांनी भाजपाच्या आमदारांवर गंभीर आरोप केले. 'विधानसभा 10 मिनिटांसाठी स्थगित केल्यानंतर भाजपाच्या आमदारांनी केबिनमध्ये येऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच यावेळी उपस्थित विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना तालिका अध्यक्षांनी या सदस्यांना थांबवा, अशी मागणी केली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही रागात असून त्यांना थांबवणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली असल्याचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले. हा सगळा प्रकार घडत असताना एकही चुकीचा शब्द चुकीचा बोललो नाही. मी काही चुकीचे बोललो असेल तर ते विरोधकांनी सिद्ध करावे, ते सिद्ध झाल्यास सदस्यांना होणारी शिक्षा मीसुद्धा भोगायला तयार आहे,
भास्कर जाधव आणि संजय कुटे यांच्यातील बाचाबाचीनंतर भाजपच्या विधानसभेतील 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले होते.