मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा

रविवार, 10 जुलै 2022 (10:02 IST)
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासगार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे असं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.पंढरपुरात आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल आणि रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली.पंरपरेला अनुसरुन राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक लता शिंदे यांच्यासोबत महापूजा केली.आज पहाटे 2 वाजून 55 मिनिटांनी विठ्ठल रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्र्यासोबत यावेळी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील मुरली नवले आणि जिजाबाई मुरली नवले हे दाम्पत्य यावर्षीचे मानाचे वारकरी ठरले. या वारकरी जोडप्याला शासकीय पूजेत मनाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला. शासकीय महापूजेनंतर या जोडप्याचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान करण्यात आला.
 
एकनाथ शिंदे शनिवारी (9 जुलै) रात्री उशिरा पंढरपूरला पोहचले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहाने आयोजित केलेल्या पर्यावरणाची वारी या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली.
 
"यंदा राज्यभरात चांगल्या पावसाला सुरुवात झालेली असल्याने सगळीकडे पेरण्या सुरू झाल्या आहेत. काहीसा उशिरा का होईना पण राज्यातील शेतकरी सुखावला आहे. हा पाऊस असाच कायम राहून सगळीकडे उत्तम पीकपाणी येऊ देत. तसेच राज्यातील बळीराजा सुजलाम सुफलाम होऊ देत." ही मागणी पांडुरंगाकडे केली असल्याचं ते म्हणाले.
 
तसंच पंढरपूर शहराचा विकास तिरुपतीच्या धर्तीवर करण्यासाठी प्रारुप आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.
 
दरम्यान, एकनाथ शिंदे आज दिवसभर पंढरपूर परिसरात विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री बनल्यानंतर महाराष्ट्रात हा त्यांचा पहिलाच दौरा आहे.

शिंदे आपल्या कुटुंबासह शनिवारी रात्री उशिरा पंढरपुरात दाखल झाले. शिंदे यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.आज मोठ्या उत्साहात आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपुरात रंगणार आहे. राज्यावरील सर्व दुःख संकट, अडचणी दूर होवो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पांडुरंगाकडे साकडं 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती