गोदावरी नदीवर दररोज होणार महाआरती; सरकारकडून कोटींचा निधी मंजूर

मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022 (15:57 IST)
अयोध्या येथील शरयू नदीच्या महाआरतीच्या पार्श्वभूमीवर आता नाशिकमधील गोदावरी नदीची महाआरती केली जाणार आहे. रोज संध्याकाळी ही महाआरती होणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. या महापूजेसाठी सरकारकडून पाच कोटींचा निधी देण्यात येणार आहे. याशिवाय या महाआरतीसाठी ११ पुजाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात येणार आहे.
 
अधिक माहितीनुसार, सांस्कृतिक मंत्र्यांच्या या घोषणेनंतर संध्याकाळी ७ वाजता गोदावरी नदीवर आरतीचे सूर सर्वत्र निनादणार आहेत. गोदावरी नदीच्या काठावर नाशिक शहर वसलेले आहे. याठिकाणी कुंभमेळाही भरत असतो. शहरामधून वाहणाऱ्या या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखले जाते. गंगा नदीप्रमाणेच गोदावरी नदीला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे तीर्थस्थान देशभरामध्ये प्रसिद्ध आहे.
 
पंचायतम सिद्धपीठमचे महंत अनिकेत शास्त्री यांच्याकडून गोदावरीच्या नदीच्या महापूजेसाठी पाठपुरावा केला जात होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून वाराणसी, अयोध्या, हरिद्वारप्रमाणेच आता गोदावरीची देखील महाआरती दररोज केली जाणार आहे. ही महाआरती बघण्यासाठी नाशिककर उत्सुक झाले आहेत.

Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती