मद्य विक्री : महाराष्ट्रात किराणा दुकानात वाईन विक्रीची परवानगी

गुरूवार, 27 जानेवारी 2022 (19:31 IST)
महाराष्ट्रात किराणा दुकानात वाईन विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
 
यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, "महाराष्ट्रात अनेक वायनरीज आहेत. त्यामुळे किराणा सामान मिळणाऱ्या सुपर मार्केटसारख्या ठिकाणी वाईन विकण्याच्या धोरणाला परवानगी देण्यात आली आहे."
 
"1000 चौरस फूटच्या जागेत शोकेस् करून वाईन विकता येईल. शेतकर्‍यांच्या फलउत्पादनाला यामुळे चालना मिळेल, असं मलिक यांनी म्हटलं.
 
"भाजपची सत्ता असणार्‍या अनेक ठिकाणी त्यांनी हे धोरण स्वीकारले आहे. हिमाचल आणि गोव्यामध्ये भाजपने हे धोरण स्वीकारलेलं आहे," असंही मलिक यावेळी म्हणाले.
 
डिसेंबरपासून सुरू होती चर्चा
नवाब मलिक यांनी राज्य सरकारच्या निर्णयाची माहिती आता दिली असली तरी याबाबत डिसेंबर महिन्यापासून चर्चा सुरू होती. त्यावेळी विविध माध्यमांमध्ये यासंदर्भात बातम्या छापून आल्या होत्या.
 
वाईनचा उपयोग बाजारात अनेक बेकरी उत्पादनांमध्ये केला जात असतो. बहुतांश वाईन्समध्ये अल्कोहोलचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे दैनंदिन किराणाचं साहित्य मिळणाऱ्या दुकानातही वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जात होता.
 
अनेक ठिकाणी वाईन ही चवीसाठी वापरली जाते. यामुळे बिअरच्या धर्तीवर वाईनचीही विक्री किराणा दुकानात सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
 
दरम्यान, दुकानांमध्ये एक लिटर वाईनमागे 10 रुपये अबकारी कर लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निर्णयामुळं राज्य सरकारच्या तिजोरीत पाच कोटींची भर पडेल, असा अंदाज आहे.
 
सध्या राज्यात दरवर्षी वाईनच्या 70 लाख बॉटल्सची विक्री होते. सरकारच्या नव्या धोरणामुळं हा आकडा 1 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती