राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दोन महिन्यापूर्वीच्या राजीनामा नाट्याचा शेवट दि. २ जुलै रोजीच्या अजित पवार यांच्या बंडाने झाला. लागलीच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ आमदारांचा शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात समावेश झाला. या बंडामुळे संपूर्ण राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली. तशी लातूर जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे. या बंडाच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांमध्ये एकवाक्यता दिसून आली नाही. जवळपास सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते द्विधा मन:स्थितीत असल्याचे चित्र आहे. त्यातल्या त्यात राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिका-यांनी कार्यकर्त्यांचा विचार घेऊन पुढील भूमिका ठरवू, असा सावध पवित्रा घेतलेला पहावयास मिळतो आहे.
मुळातच सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून राज्यात धक्कादायक राजकारणाची पडलेली परंपरा आजही कायम राहिली आहे. अजित पवार यांनी बंड करीत भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठींबा दिल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. त्यानंतर लगेच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला. या बंडाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. तशी खळबळ लातूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही उडाली. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँगेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांंमध्ये या बंडाच्या अनुषंगाने एकवाक्यता दिसून येत नाही.
आज, उद्या कार्यत्यांची बैठक घेऊन त्यात चर्चा करुन भूमिका निश्चित केली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिका-याने सांगीतले. असे असले तरी काहीं पदाधिकारी यांनी मात्र कार्यकर्त्यांचा विचार घेऊ, आताच सांगणे योग्य होणार नाही, अशी तटस्थ भूमिका घेतलेली आहे.